Ek ratra jhapataleli 1

नारायण धारप, रत्नाकर मतकरींच्या भूतकथा वाचण्यात लहानपण गेलं. पुढेपुढे तो छंद कमी होण्याऐवजी वाढत राहिला. आई – आजी – पणजी कडून अशा कथा ऐकत मोठं होताना झपाटलेल्या जागा, गूढ, रहस्यमय अनुभव आणि ते ऐकून भीतीने अंगावर सर्रकन येणारा काटा हे सारं हवंहवंसं वाटू लागलं..
रोहन मंकणीला फेबुच्या माध्यमातून गेली काही वर्षे ओळखत होते. त्यातून त्याच्या पोस्ट्स आणि शेतीचे फोटो अनेकदा दिसायचे. कधीतरी इथे जायचं असं मनात होतं. त्यातच फेब्रुवारीमध्ये रोहनने गूढकथा वाचन कार्यक्रमाची पोस्ट केली, ती पाहून तिथे जायचं हे मनाने नक्की केलं आणि लागलीच बुकिंग करून टाकलं.
पोस्टमधून भयकथा वाचन होणार हे कळलं होतं, पण नेमकी रूपरेखा माहीत नव्हती. नऊ मार्चची वाट बघत countdown सुरू होता.उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कौस्तुभ केळकर सर वाचन करणार हेही तोवर कळलं होतं. त्यांच्या कथांची पंखी मी आधीपासूनच होते. त्यात त्यांच्याकडून काळोख्या रात्री भूतकथा ऐकताना आणखी मजा येणार म्हणून पोटात बुडबुडे, फुलपाखरं, भीती या सगळ्यांची सरमिसळ होत होती. पण फेब्रुवारीमध्ये ताप आणि खोकल्याने जबर आडवी झाले होते, कार्यक्रमाला जाता येईल की नाही इथवर त्रास होत होता. तरी या कार्यक्रमाचं गारुड इतकं जबरदस्त होतं की औषध आणि willpower वर तरून गेले.
शेवटी एकदाची नऊ मार्चची तारीख उजाडली. सगळं आवरून मंकणी अ‍ॅग्रो इस्टेट्स ला पोहोचतो अंधार होऊ लागला होता. जवळपास एक चक्कर टाकून आलो, तोवर इतर मंडळी बऱ्यापैकी जमली होती. फार्म हाऊस वर चहा कॉफीची मस्त सोय केलेली होती. शिवाय रोहन आणि त्याच्या टीमने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली होती.  विनायक दादाने आम्हाला मोकळ्या रानावर चक्कर टाकून आणलं, एकीकडे सगळ्यांच्या ओळखी करून देत, वेगवेगळे खेळ खेळत आमच्यातला अवघडलेपण दूर सारायला मदत केली. तोवर जेवणं तयार होती. घरगुती, ताजं, गरम अन्न समोर आलं, ते पाहूनच कडकडून भूक लागली. बोनस म्हणून typical चवीचं गावाकडचं चिकन पानात आलं. ती चव अजून रेंगाळते आहे जिभेवर. ते जेवण म्हणजे केवळ समाधान आणि तृप्तीचा अनुभव होता.
जेवण आटोपलं तसं अंगणात सतरंजीवर पसरून आम्ही तयारीत बसलो. काजळकाळा अंधार, उघड्या माळावर मोकळ्या आभाळाखाली, अंगावर सरसरून काटा आणणारा गारवा आणि शांतता. अशा वातावरणात कौस्तुभ सर आणि मोनिका मॅमनी एकएक कथा वाचायला सुरुवात केली आणि विलक्षण अशी कथांची मालिका आमच्यासमोर उलगडू लागली. सरांचा धीरगंभीर आवाज वातावरण भारून टाकत होता. कथा केवळ वाचणं आणि आवाजातल्या चढ उतारांच्या मदतीने ती कथा जिवंत करणं यातली गंम्मत कौस्तुभ सरांनी उलगडून दाखवली. त्यांची बुडव्याची कथा अजूनही अंगावर शिरशिरी आणते. रात्री एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम बाहेर अंगणात सुरू राहिला. त्यानंतर वाढत्या गारव्यामुळे आम्ही सगळे घरात आलो. पुढे उस्फूर्तपणे प्रत्येकाने आपापले अनुभव सांगण्यास सुरुवात केली. काळ्या जादूपासून प्रत्यक्ष भुतांचा/ आत्म्यांचा अनुभव अंगावर भीतीचा काटा आणत होता. समांतर जगात वेगवेगळ्या लोकांना जाणवणारे वेगवेगळे प्रसंग, अनुभव यांची भन्नाट अनुभूती त्या रात्री झाली.
कार्यक्रम आटोपून बाहेर आलो. तिथे अंगणात लावून दिलेल्या तंबूमध्ये झोपणं हे केवळ स्वर्गसुख होतं. शहरातल्या कोलाहल आणि गोंगाटात दोन क्षण नितळ शांततेचे मिळणं अशक्य होऊन बसलंय. ते सुख या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळालं. रात्री दूरवर मंदिरात चालणारे भजन, सकाळची भूपाळी, सुखद गारवा, न चाळवलेली – समाधानी झोप, डोळ्यांनी सकाळी उठायला केलेला असहकार, किती आणि काय काय गवसलं त्या ठिकाणी म्हणून सांगू..
पैशांनी सोयी मिळतात केवळ. समाधान आतून झिरपावं लागतं. रोहनच्या घरी त्यादिवशी हे समाधान आपसूक गवसलं. तिथल्या सगळ्या मंडळींनी आमची उत्तम काळजी घेतली तेही मोकळ्या मनाने – अगदी मनापासून.
सकाळी आसपास पुन्हा एक चक्कर टाकली. मस्तपैकी पोहे – पोह्यांचा पापड – चहाचा नाश्ता करून पुण्याकडे परतलो. आणखी एक बोनस आम्हांला मिळाला – येताना पूर्णवेळ कौस्तुभ सरांसोबत गप्पा. तो दिवस न मोजता येणाऱ्या अनेक सुखांची देणगी देऊन गेलाय.
रोहन, तुला आणि मंकणी अ‍ॅग्रो इस्टेट्सच्या सगळ्या मंडळींना खूप खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा. तुमच्या फार्म हाऊसवर घालवलेला वेळ कायम स्मरणात राहील. तिथे परतून यायची संधी आम्ही नेहमी शोधत राहू.

मुग्धा गोखले